दिवसा ढवळ्या बाप्पाच्या घरातच चोरी…

कोल्हापूर: कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील आयडियल स्पोर्ट्स मंडळाच्या गणपतीचा चांदीचा हार चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

याप्रकरणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जूना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की ,संभाजीनगर परिसरात आयडियल स्पोर्ट्स हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून भक्तिभावाने कायमस्वरूपी नऊ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे.

तसेच या मंडळाचा बाप्पा नवसाला पावणारा देखील आहे, त्यामुळे भक्तांकडून आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून भक्तिस्वरुपात या बाप्पाला अनेक दागिन्यांनी सजवले जाते.या मूर्तीवर दागिने असल्याने मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सव काळात रोज रात्री तिथे झोपायला असतात. आज सकाळी हे कार्यकर्ते उठून सकाळी नऊच्या सुमारास आवरण्यासाठी घरी गेल्यानंतर ही घटना घडली. यामध्ये चोरीचा हार साधारण अर्धा किलो वजनाचा असल्याचा सांगितला जात आहे.

चोरट्याने हा हार एका बाजूला धारधार वस्तूने कट करून तर दुसऱ्या बाजूला हिसडा मारून घेतल्याच्या खुणा मूर्तीवर दिसत आहेत.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तात्काळ मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

संभाजीनगर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या परिसरात दिवसाढवळ्या मंडपात येऊन दागिने पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने पोलिसांनीही याबाबत कसून तपास करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

News Marathi Content