जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून लम्पी साथरोग लसीकरण पाहणी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये जनावरांमध्ये लम्पी स्किन या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलही अनेक जनावरे लम्पी रोगाने आजाराने बळी पडली आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यातील लम्पी आजार झालेल्या जनावरांची पाहणी केली. या बाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबतच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.

लम्पी आजार संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकातून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत सदरचा आजार हा विषाणुजन्य असून अत्यंत संसर्गजन्य आहे. या रोगाचा प्रसार धावणा-या माशा, डास, गोचिड चिलटे जनावरांशी संपर्क तसेच बाधित चारा व पाणी यामुळे होतो. जनावरांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे.

या आजारामध्ये जनावरांच्या अंगावर १० ते५० मि. मी व्यासाच्या गाठी येतात. भरपूर ताप येतो. डोळयांमधून, नाकातून चिकट स्त्राव येतो. दुध उत्पादन कमी होते. काही जनावरामध्ये पायाला सूज येऊन जनावर लंगडते. बाधित जनावरे औषधोपचाराने २ ते ३ आठवडयात बरी होतात. क्वचित प्रसंगी बाधित पशुधनाचा मृत्युही होवु शकतो.लम्पी धर्म रोग प्रतिबंधात्मक खालीलप्रमाणे उपाययोजना करणेत याव्यात. गोठयामध्ये डास, माशा, गोचिड यांचा प्रादुभाव होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीना सूचना देण्यात याव्यात. यासाठी डास, माशी, व गोचिड इत्यादी रोगप्रसारक किटकांचा प्रादुभाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

पशुपालकांना त्यांच्या जनावरांमध्ये लंपी सदृश्य लक्षणे अशा तात्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. गोठ्यामध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड २ ते ३ टक्के द्रावण, फिनेल २ टक्के किया फॉर्मेलिन १ टक्के ची फवारणी करणे, संपूर्ण गावामध्ये किटकनाशक औषधाची फवारणी करावी आणि या रोगाबाबत गावातील पशुपालकांना दवंडी, ग्रामवाहिनी या माध्यमातून जनजागृती करावी अशाही सूचना देण्यात याव्यात.

लंपीसदृश्य लक्षणे आढळल्यास सदरची माहिती तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय किंवा पुशधन अधिकारी (वि.)पंचायत समिती यांना तात्काळ देण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचे पालन करून अहवाल या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.