विकास सेवा संस्थांनी नाबार्डच्या “पॅक्स टू मॅक्स” या योजनेचा लाभ घ्यावा…….

कागल : नाबार्डच्यावतीने के मडीसीसी बँकेमार्फत सुरू असलेल्या “पॅक्स टू मॅक्स” या योजनेचा लाभ विकास सेवा संस्थांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.

या योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील विकास सेवा संस्थांना करावयाच्या तीन कोटी अर्थ पुरवठ्याची मंजुरीपत्रे मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी, शेती पतपुरवठा संस्थांना बहुउद्देशीय सेवा केंद्रांमध्ये रूपांतरित करणाऱ्या योजनेतून कागल तालुक्यातील तीन प्राथमिक विकास सेवा संस्थांना तीन कोटी रुपयांचा अर्थ पुरवठा करण्यात आला. संस्थेच्या इमारत बांधणीसह, गोदाम बांधकाम व इतर अनेक अनुषंगिक बाबीसाठी हा कर्ज पुरवठा केला जातो. सुरुवातीला चार टक्के इतक्या व्याजदराने आकारणी व नंतर तीन टक्क्यांचा व्याज परतावा, अशी ही कीफायतशीर योजना आहे. श्री. अंबाबाई विकास सेवा संस्था- व्हनाळी: ४९ लाख, जय हिंद विकास सेवा संस्था- बानगे: ७० लाख आणि शिवाजी विकास सेवा संस्था- कागल: एक कोटी, ६८ लाख याप्रमाणे हा पतपुरवठा होणार आहे.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नामदेवराव एकल, सौरभ पाटील, बाळासाहेब तुरंबे, डी. आर. चौगुले, सुनील माळी, सदाशिव तुकान, राजू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.