सीपीआर प्रशासनाने दक्ष रहावे : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून, सर्व सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्याच पाहिजेत, तो त्यांचा अधिकार आहे. यासाठी सीपीआर प्रशासनाने कायम दक्ष रहावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले. कोल्हापूरातील थोरला दवाखाना अर्थात सीपीआर रुग्णालयाचे सक्षमीकरण करून, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया असे आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले.

सीपीआरला आज आमदार जयश्री जाधव यांनी यांनी भेट देऊन अधिष्ठाता डॉ. अशोक गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली. यावेळी डॉ. गिरीष कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित लोकरे, डॉ. अनिता सैबिनावर, डॉ. ज्योत्स्ना देशमुख, डॉ. अनिता परितेकर, डॉ. संजय मोरे, बंटी सावंत आदी उपस्थित होते.सर्वच वृत्तपत्रातून सीपीआर मधील अनास्था, अनागोंदी कारभार, हेळसांड याविषयीच लिखाण होते. एकाही वृत्तपत्राला सीपीआर बद्दल चांगले लिहीण्याची इच्छा होत नाही असे का ? असा सवाल करत प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत याकडे लक्ष द्यावे अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.सीपीआर येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली आहे. त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा. आयसीयू, लहान मुलांचा विभाग व अपघात विभागात किती व्हेंटिलेटर बंद आहेत, किती चालू आहेत, याची माहिती घेत. जे बंद आहेत त्याची दुरुस्ती करून घ्यावी. ओपीडीची वेळ वाढवून दोन वाजेपर्यंत करण्यात यावी. रुग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी सविस्तर माहिती दिली जात नसल्याची तक्रार आहे, यात सुधारणा व्हावी. दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपचे कक्ष मोठे करण्यात यावे तसेच प्रमाणपत्र देण्यासाठी तीन दिवस पूर्ण वेळ काम सुरू राहावे अशा सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिल्या.ऑर्थोपेडिक ऑपरेशनमध्ये हे महात्मा फुले योजनेतून होतात, तरी ही त्याचे साहित्य पेशंटला बाहेरून का विकत घ्यावे लागते असा सवाल आमदार जाधव यांनी केला. यावेळी त्या साहित्याचे रुग्णांना पैसे परत दिले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पैसे परत मिळत नसल्याची अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. यामध्ये सुधारणा केली जावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.मेंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य घेण्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाले. तरीही ते साहित्य रुग्णालयात का आले नाही असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला. यावेळी ठेकेदारांनी साहित्य देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. यावर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि साहित्य खरेदीची पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवा अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.एमआरआय मशीनच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाली असून एमआरआय मशीन सीपीआरमध्ये लवकर यावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.आमदार जाधव यांच्या बहुतेक प्रश्नांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपुरे मनुष्यबळ आहे, वाढीव मनुष्यबळासाठी प्रस्ताव पाठवल्याचे उत्तर दिले. त्यावर आमदार जाधव यांनी सर्व विभागाचे प्रस्ताव तयार करून द्या, ते मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.थोरला दवाखाना कोल्हापूरची अस्मिता आहे आणि तो सुसज्जच पाहिजे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रित काम केल्यास खासगी रुग्णालयाशी स्पर्धा करेल असे सीपीआर तयार करता येईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.