
खुपीरे : ग्रामपंचायत हद्दीतील २० मिटर रस्ता चोरीसंदर्भात पुराव्यानिशी सनदशीर मार्गाने आंदोलन करून ३ महिन्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेने काहीच कारवाई न करता वंचित दलित कुटुंबियांवर गेल्या १३ वर्षाप्रमाणेच जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२३ रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्धार जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी व्यक्त केला.

खुपीरे येथील हरिजन वसाहत मधील संजय कांबळे ते जयसिंग कोठावळे या १३० मि लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव खुपीरे ग्रामपंचायतीने देऊन देखील केवळ ११० मिटरचा रस्ता बांधकाम विभागाच्या अधीकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे झाला असून उर्वरित २० मिटरच्या रस्त्यावरती याअगोदर रस्ता व आर. सी. सी गटार झालेले आहेत. याची ग्रामपंचायत नमुना नं. २६ ला नोंद असताना देखील पंचायत समिती बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सदरचा रस्ता भ्रष्टाचाराने अपूर्ण ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक अवमान करत असल्याचे निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे , मुख्यमंत्री, गृहमंत्री व संबंधित सर्व घटकांना लेखी कळविले आहे.
तसेच या उर्वरित २० मिटरच्या रस्त्याच्या बाजूस इंदिरा आवास घरकुल या शासकीय योजनेतून घर मंजूर होऊन तिथे घर बांधून त्यामध्ये कृष्णात कांबळे कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्यास राहत आहे. याचाच अर्थ शासनाचा निधी घरकुल योजनेवर व उर्वरित वीस मीटरवर खर्ची पडला आहे याचे सबळ पुरावे प्रशासनाकडे उपलब्ध असताना तसेच पुनःश्च एकदा त्यांना पुरावे देऊन सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या गेंडयाच्या कातडीच्या प्रशासनास किमान आमच्या आत्मदहनाने तरी जाग येईल असे मत शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी व्यक्त केले.
रस्ता हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने देखील एका खटल्यासंदर्भात आदेश पारित करताना एखाद्या जागेवर शासकीय खर्च पडला असेल तर त्या जागेवर शासनाचा हक्क कायमस्वरूपी अबाधित राहतो. हे दिनांक १२ मे १९९५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध होत आहे. सध्यस्थीतीच्या पावसामुळे या २० मीटरच्या रस्त्यावरून चालताना माता – भगिनी, आबाल – वृद्ध पुरुष यांचे चिखलामधून पाय घसरून आजही अनेक अपघात होता आहेत.
यामध्ये एखाद्या दिन दुबळ्याचा जीव जाण्याची दाट शक्यता असल्याने संबंधित विषयांमध्ये दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करून सदरहू वीस मीटरच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण करण्याचे काम १४ ऑगस्ट पूर्वी पूर्ण केले नाही तर मी स्वतः जिल्हा सचिव प्रसाद पाटील, शहराध्यक्ष राजू दिंडोले व कृष्णात कांबळे यांच्या कुटुंबासह 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचगंगा नदी, राजाराम तलाव, कळंबा तलाव, राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण किंवा अन्यत्र कोठेही सामूहिक आत्मदहन करणार आहोत. त्यास सर्वस्वी मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ( जिल्हा परिषद ), गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी ( पंचायत समिती करवीर ) उप अभियंता, शाखा अभियंता ( बांधकाम विभाग करवीर ) ग्रामसेवक ( ग्रामपंचायत खुपीरे ) इ. अधिकारी व संबंधित सर्व घटक या आत्मदहनास जबाबदार राहतील असा इशारा जिल्हा सचिव प्रसाद पाटील, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिला.
