
कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात कागल मतदार संघातील 14 गावात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यापैकी सात गावातील प्रक्रिया पूर्ण झाली असून सात गावांमध्ये तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी डाॕ. राहुल रेखावार, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार (महसूल) सरस्वती पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.यावेळी जिल्हाधिकारी डाॕ.रेखावार यांनी या योजनेची प्रभावीपणे व जलद गतीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संबधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
घाटगे पुढे म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यासाठी मोर्चा आंदोलने ही करण्यात आली आहेत. शासनाने शेतकरी वर्गाला दिवसा वीज मिळावी याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली आहे.या योजने अंतर्गत गावात असणाऱ्या गायरान जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत.त्यासाठी कागल मतदारसंघातील चौदा गावची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी वर्गाला दिवसा वीज पुरवठा होणार आहे.
ही आहेत चौदा गावे: या योजनेचे निकष पूर्ण केलेल्या गावांमध्ये कसबा सांगाव मौजे सांगाव कुरुकली केनवडे पिंपळगाव बुद्रुक करंबळी व उत्तूर या गावांचा समावेश आहे तर बामणी शेंडूर बानगे सोनगे हमीदवाडा सावर्डे खुर्द व मुमेवाडी या गावातील जागांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
