वेगाने बदलणाऱ्या तंत्रयुगात अभियांत्रिकी शिक्षणाला उज्ज्वल भवितव्य: मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा उज्वल आहे. या परंपरेला पुढे घेऊन जाण्यात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या अभियांत्रिकी शिक्षणात अपरिचित आणि सर्वव्यापी तंत्रज्ञानाचा उदय होत आहे. शिक्षण हे निव्वळ जगण्याचे साधन न होता ते जगवण्यासाठी झाले पाहिजे. इंजिनिअरिंग हे क्षेत्र उद्योग व अर्थव्यवस्थेशी जोडले गेले असल्याने यातून रोजगाराच्या संधींची उपलब्धता होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या धोरणात मातृभाषेला महत्त्वाचे स्थान असून वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेतुन झाल्यास चांगले संशोधक निर्माण होतील. संस्थेने भविष्यात पॅरा मेडिकल कोर्सेस सुरू करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.

ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. यावेळी संस्थेचे सहसचिव (प्रशासन) मा.प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) सिताराम गवळी, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख मा. श्री. श्रीराम साळुंखे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विरेन भिर्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक मा. महेश काकडे, गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे समन्वयक मा.डॉ. रणजित सावंत, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य धनराज भोसले, मा. राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष मा. डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी संस्थेला दिलेल्या ब्रीदवाक्यात नव्याने स्थापन होणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाशिवाय आजचे जीवन अशक्य आहे. समाजाच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान फार गरजेचे आहे. जगाच्या बाजारपेठेत भारतीयांनी विश्वास संपादन केल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे शिक्षकांचे काम आहे, हे काम व्यवस्थित पार पाडल्यास देश स्वावलंबी बनेल. आज देशाच्या तंत्रशिक्षणाला वेगळी दिशा देण्याची गरज आहे. ही गरज डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय पूर्ण करेल, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी जाणले होते. त्यांच्या याच विचारास अनुसरून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे, असे मत मांडले.

यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी सेवा हे मूल्य बापूजींनी समाजाला पर्यायाने गुरुदेव कार्यकर्त्यांना दिले. या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून देशसेवा व समाजसेवा करण्यासाठी विद्यार्थी घडतील, असे मत मांडले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्थापनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रकाश मेडशिंगे, महेश साळुंखे, डॉ. पी. सी. भास्कर, विरेन भिर्डी, अमित आव्हाड, कृष्णात इंगळे तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थिनी कु. अलसाबा सय्यद हिची चीनमधील हेनॉन विद्यापीठात पीएच.डी. संशोधनासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात रोपट्यास पाणी घालून, दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना व भक्तिगीते सादर केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी केले.

आभार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्य सौ. शुभांगी गावडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. अशोक पाटील, डॉ. कविता तिवडे, प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, आजीव सेवक, प्राध्यापक, एन.एस.एस व एन.सी.सी.चे विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706