
पुणे : पुणे महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याचा केलेला दावा पोल ठरलेला आहे, पुणे शहरात अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठ – मोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून पुणे मनपा प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांनी केला. छत्रपती संभाजीराजे यांच्या सूचनेनुसार स्वराज्य च्या वतीने राज्यभर १०० पेक्षा जास्त ठिकाणी खड्डे बुजवा – जीव वाचवा हे आंदोलन करण्यात आले असून सत्ता संघर्षात मशगुल असलेले राज्यकर्ते या गंभीर मुद्द्याकडे लक्ष देणार का ? असा सवाल देखील स्वराज्य चे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांनी उपस्थित केला.

स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्यभरात १०० ठिकाणी आंदोलन करण्यात आले, यातील पुणे शहरात खड्ड्यांच्या विरोधात ‘खड्डे बुजवा -जीव वाचवा’ आंदोलन करण्यात आले. RTO चौक व अलका चौक येथे प्रामुख्याने आंदोलन करण्यात आले. RTO चौक येथून जुन्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झालेली आहे. या रस्त्यावर ‘स्वराज्य’ च्या वतीने खड्ड्यांना हार व फुले वाहण्यात आली, खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून, साचलेल्या पाण्यात होडी सोडण्यात आल्या, सोबतच खड्ड्यांचे आशीर्वाद घेवून ‘आमचे रक्षण कर’ असे उपहासात्मक विनंती करण्यात आली. ‘सगळे नेते एका पक्षात, रस्ते नाही कोणाच्या लक्षात’, खड्डे बुजवा – जीव वाचवा, स्वराज्य संघटनेचा विजय असो! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
