
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील दोन दिवस धरण क्षेत्र तसेच पंचगंगेच्या खोऱ्यात संततधार सुरु होती. दरम्यान धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कुंभी, कासारी व राधानगरी या धरणांचा मिळून अंदाजे 8 हजार क्युसेक विसर्ग पंचगंगेत येण्याचा अंदाज असून पुढील 15 तासात 45 फुटावर जावू शकते. पंचगंगा धोका पातळीवर वाहण्यास सुरुवात झाल्यावर कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन न जाता वेळेत पाणी येण्याआधीच स्थलांतर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेद्वारे नागरिकांना केले आहे.

सध्या राजाराम बंधारा येथून 60 हजार 106 क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरीतून येणारा नवीन विसर्ग 7 हजार क्युसेक आहे. कुंभी व कासारी मधून अनुक्रमे 700 व 1 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. असा मिळून 8 हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग पंचगंगा नदीत वाढणार आहे. या काळामध्ये अजून पाऊस पडल्यास पुढे पाणीपातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वेळेत आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.
