
कोल्हापूर : कोल्हापुरात महापूर येण्याची शक्यता आहे. कारण पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने आधी इशारा पातळी ओलांडली आहे. अशातच आता राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीनंतर जिल्हाप्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे. आज आणि उद्या कोल्हापूर सांगलीसह सातारा जिल्ह्याला हवामान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 28 जुलैपासून परीक्षा पूर्ववत होणार आहेत.
