जिल्हा परिषदेचे नवे सीईओ संतोष पाटील यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ संतोष पाटील यांनी आज (मंगळवारी) आपल्या सीईओ पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनीषा देसाई यांनी पाटील यांचे स्वागत केले. या आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या रिक्त आलेल्या ठिकाणी संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी आज कोल्हापुरात आल्यानंतर श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेतली. दुपारनंतर ते जिल्हा परिषद मध्ये आले आणि पदभार स्वीकारला.

संतोष पाटील हे मूळचे ठंडेगाव (ता. बार्शी) येथील आहेत. कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुणे येथे त्यांनी कृषी महाविद्यालयाची पदवी घेतली . १९९५ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली. १९९६ मध्ये त्यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) व प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

२०१६ ते २०१८ या काळात नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. २०१८ ते २०२० या काळात पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. २०२० मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

तेथे त्यांनी २०२२ पर्यंत काम पाहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून काम सध्या ते पाहत होते. पाटील यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदावर काम करायचे आहे. त्यांचा प्रशासनातील मोठा अनुभव पाहता. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्याकडून उल्लेखनीय कार्य होईल अशी अपेक्षा आहे.

🤙 8080365706