शिये परिसरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिये : शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात विकास निधी देणार असल्याचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. शिये ( ता. करवीर ) येथील कुमार जाधव यांच्यासह निगवे, जठारवाडी, सादळे, मादळे व भुयेवाडी येथील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कुमार जाधव यांच्या प्रवेशानंतर राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिये येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शितल मगदूम या होत्या.यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी शियेतील व्यायाम शाळा व महालक्ष्मी मंदिरासमोर सभागृह उभारणीसाठी निधी देणार असल्याचे जाहीर केले.संकटकाळात समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून राजेश क्षीरसागर यांची निवड झालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते व विविध संस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक हनमंत पाटील यांनी केले.सुत्रसंचलन अंकुश निपाणीकर यांनी केले तर आभार डॉ.प्रमोद जाधव यांनी मानले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सदस्य कृष्णात पोवार, जयसिंग काशीद, माजी उपसरपंच विलास जाधव, शिवाजी पाटील, शिवाजी जाधव, सुनील जाधव यांच्या सह शिवसैनिक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.