कोल्हापूर अर्बन बँकेची चौकशी सुरु…..

महाराजा हॉटेल कर्ज प्रकरण ६५ लाखांची वसुली भोवणार

कोल्हापूर : येथील कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची सहकार कलम ८३ अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या आदेशानुसार ही चौकशी करण्यासाठी पन्हाळ्याचे सहाय्यक निबंधक नारायण परजने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

यामुळे महाराजा हॉटेल कर्ज प्रकरणातील दुकान गाळे लिलाव संचालकांना भोवण्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी अर्बन बँकेत हॉटेल महाराजाची मालमत्ता व वाहन तारणासह विविध सहा ते सात कर्ज प्रकरणे आहेत. त्याची वसुली थकल्याने हॉटेलच्या चार ते पाच दुकान गाळ्यांचा लिलाव केला होता.यातून ६५ लाख रुपये वसूल झाले होते. ही वसुली बँकेत जमा न झाल्याची तक्रार केली आहे यानुसार बँकेचे टेस्ट ऑडिट करण्यात आले. शासकीय लेखा परीक्षक निरंजन पैलवान यांच्याकडून हे लेखापरीक्षण करण्यात आले. यात ही पंधरा लाख रुपयांची रक्कम बँकेत जमा नसल्याचा अहवाल शासकीय लेखा परीक्षक पैलवान यांनी दिला होता. दरम्यान चार पाच महिन्यापूर्वी राज्याचे सहकार आयुक्त कवडे कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर आले होते तेव्हा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खोंद्रे यांनी अर्बन बँकेच्या चौकशीची मागणी केली होती. याच्या आधारे सहकार आयुक्त कवडे यांनी सहकार कलम ८३ अंतर्गत चौकशी सुरू केली आहे दरम्यान चौकशीत व ६५ लाखांचा गैरव्यवहार स्पष्ट झाल्यास सहकार कलम ८८ अंतर्गत संचालकांवर जबाबदारी निश्चित करून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.