
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकानी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली आहे.

कर्करोगावरील उपचारामध्ये ‘’प्रोसेस फॉर एम्बेडिंग लिपीडिक नॅनोपार्टिकलमध्ये ओलीईक ऍसिड कोटेड सुपर मॅग्नेटिक आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल इन लिपीडक नॅनोपार्टिकल फॉर एनहान्सिंग हायपरथेरेमीक एफिसीएन्सिंग’ या विषयावरील संशोधनासाठी हे पेटंट जाहीर झाले असून विद्यापीठाला मिळालेले हे १० वे पेटंट आहे.

डॉ. अरविंद गुलबाके व डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे (रिसर्च डिरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित केलेल्या या पद्धतीसाठी १६ मे २०१९ ला संशोधकांनी पेटंटसाठी अर्ज केला होता. विविध चाचण्यांमधून आणि 3 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट मंजूर झाले.

या संशोधांतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटेंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.या संदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत मिळालेले हे दहावे पेटंट आहे. विद्यापीठ प्रशासन आणि संशोधकांच्या दृष्टीने आनंददायी बाब असून त्यामुळे संशोधन कार्याला अधिक गती मिळाली आहे. या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. अरविंद गुलबाके व रिसर्च डिरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी तैहसीन मोमीन, सत्यजित हारुगले, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी अभिनंदन केले.
