
कागल: सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांचा कै.विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार व देशाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी नवी दिल्ली यांचा यांचा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना असे दोन पुरस्कार व्ही.एस.आय पुणे येथील शानदार सोहळ्यात कारखान्यास प्रदान केले.

हंगाम 2021 -22 करिता कारखान्यास हे दोन्ही पुरस्कार जाहीर झाले होते.माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.
शाहू साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे , उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आ. वीरकुमार पाटील सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
यावेळी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.व्यासपीठावर,विरोधी पक्ष नेते अजित पवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, राजेश टोपे, जयंत पाटील, सतेज पाटील, दिलीप वळसे -पाटील यांच्यासह व्ही एसआय चे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारांमुळे कारखान्याच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कारांची एकूण संख्या 67 झाली असून या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वच घटकातून समाधान व्यक्त होत आहे.
