
कोल्हापूर : इंडियन डेअरी फेस्टिवलचे उद्घाटन येत्या शुक्रवारी 20 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते तर प्रदर्शनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंडियन डेअरी फेस्टिवलचे निमंत्रक गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली. या फेस्टिवल विषयी अधिक माहिती देताना चेतन नरके म्हणाले हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन तसेचशाहूपुरी जिमखाना येथे प्रदर्शन असून देशभरातील 100हून अधिक संस्थांचा सहभाग आहे.
पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवार 20 जानेवारी रोजी पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेल्या दूध परिषदेचे सकाळी11.30 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर मध्ये प्रथमच गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्या पुढाकारातून 20 ते 22 जानेवारी दरम्यान इंडियन डेअरी फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार, स्वयंरोजगार आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात डेअरी क्षेत्राचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील संधी, आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच यातील संधी आणि आव्हाने यावर चर्चा करून 2030 पर्यंतची दिशा आणि ध्येय धोरणे निश्चित करण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे.
शुक्रवार 20 जानेवारी रोजी विक्टोरिया हॉल हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेच्या उद्घाटनाने इंडियन डेअरी फेस्टिवल ला सुरुवात होईल. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या दूध परिषदेच्या पहिल्या सत्रास सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. यामध्ये दुग्ध व्यवसायातील बदलती परिस्थिती या विषयावर अनुप कुमार (अप्पर मुख्य सचिव, सहकार आणि पणन, महाराष्ट्र शासन), राजीव मित्रा (सीईओ, प्रभात डेअरी), निरंजन कराडे (टीम लीडर इनोव्हेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेल NDDB), योगेश गोडबोले (व्यवस्थापकीय संचालक, गोकुळ दूध संघ) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
दुपारी 1 वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात दुग्ध व्यवसायातील नवे तंत्रज्ञान या विषयावर रामवन व्यंकटेशन (संस्थापक, डिजीटी टेक्नॉलॉजी प्रा. लि.), राहुल देशपांडे (सीईओ, एनव्हीकेअर लॅब), एन. के. भटनागर (सीईओ एव्हरेस्ट इन्स्टुमेंट प्रा. लि.), विश्वास चितळे (सीईओ, चितळे डेअरी) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. दुपारी 3 वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये पशुसंवर्धनाचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर परम सिंग (संस्थापक, मु फार्म प्रा. लि.), डॉ. शांताराम गायकवाड (व्यवस्थापक, गोविंद मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट), डॉ. दयावर्धन कामत (वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, गोकुळ दूध संघ), डॉ. प्रफुल्ल माळी (पशुसंवर्धन तज्ज्ञ) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.संध्याकाळी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता दूध परिषदेचा समारोप होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार रोहित पवार, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय .पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत.

शाहूपुरी जिमखाना येथे प्रदर्शन 20 ते 22 दरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे इंडियन डेअरी फेस्टिवलचे प्रदर्शन होणार आहे . येथे दुग्ध व्यवसायातील देशभरातील 100हून अधिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसायिक यांना दुग्ध व्यवसायातील होत असलेली बदल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
लकी ड्रॉ पद्धतीने मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इंडियन डेअरी फेस्टिवल ला भेट देणारे दूध उत्पादक शेतकरी, व्यवसायिक यांच्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये प्रवेश करताना संबंधितांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे. यामधून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी म्हैस, द्वितीय क्रमांकासाठी चाफ कटर , तृतीय क्रमांक साठी मिल्किंग मशीन आणि उत्तेजनार्थ 10 विजेत्यांना सायलेज बॅग देण्यात येणार आहे.
