
कसबा बावडा/वार्ताहर : फार्मसी क्षेत्र हे प्रचंड वेगाने विस्तारणारे क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. जीवनाच्या अंतापर्यंत फार्मसी क्षेत्राची आवश्यकता भासते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी. फार्म, डी. फार्म शाखासाठी प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांचे स्वागत करून फार्मसी कॉलेज व उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती दिली. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. शर्मा म्हणाले वैद्यकीय व्यवसायाबरोबर फार्मसी क्षेत्रही हातात हात घालून काम करत आहे. आपल्या वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या अनुभवाचा फायदा या विद्यार्थ्यांना होईल. प्राचार्य डॉ. जंगमे म्हणाले, औषध निर्माण अर्थात फार्मसी हा जगातील सर्वात मोठा उद्योग आहे. भारत हा सर्वात मोठा औषध निर्माता देश असून जगभरातील अनेक देश भारतावर अवलंबून आहेत. कोरोना काळात आपल्या देशाची औषध निर्माण क्षमता व सामर्थ्य याची प्रचिती आली आहे. कुलगुरू डॉ. मुदगल यानी अभिमत विद्यापीठ उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती प्रेझेन्टेशनद्वारे दिली. फार्मसी क्षेत्रात असलेल्या विविध करिअर संधीची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपकुलसचिव संजय जाधव, सुरेंद्र खोपडे, फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अभिनंदन पाटील, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दोन विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती
डी. फार्मसाठी सर्वाधिक गुणांनी प्रवेश घेतलेल्या सानिका सज्जन पाटील व बी. फार्मसाठी सर्वोत्तम गुणांनी प्रवेश घेतलेल्या दिव्या नामदेव लाड या दोन्ही विद्यार्थीनीना कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशीप जाहीर केली. या दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते या दोघीना याबाबतचे पत्र देण्यात आले.
