
कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु केल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन महिन्यांपूर्वी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुतोवाच केले होते. आता प्रत्यक्ष तांत्रिक सल्लागाराची निविदा प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे पहावे लागेल.महाराष्ट्रातील कोयना, पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णेद्वारे अलमट्टीलाच मिळते. अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर या सर्व नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. या अगोदरही कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढविण्याचे जाहीर केले होते, मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरूनआंदोलन केले. आताही काही संघटना या विरोधात आहेत.