प्रथम वर्ष प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बंधनकारक….

मुंबई : राज्यात १८ ते १९ वयोगटातील १० टक्क्यांहूनही कमी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे यापुढे विद्यापीठातील प्रथम वर्ष प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

त्यासाठी येत्या काही दिवसांत राज्यातील विद्यापीठांना त्यांच्या परिनियमांत आवश्यक बदल करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण मतदार संख्येपैकी, १८ ते १९ वयोगटातील नोंदणीकृत मतदारांची संख्या केवळ ०. ३४ टक्के आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागृती होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत यासाठी आवश्यक ती पावले घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठातील परिनियमांत आवश्यक ते बदल करून प्रवेशाच्या वेळी मतदार ओळखपत्र ही महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून सादर करता येईल असा विचार सुरु असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शिवाय मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडून ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवून मदत करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.