कर्नाटकचा महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ; सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सोडलं पाणी

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आलेला असताना कर्नाटकनं महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलं आहे.

म्हैसाळ पाणी योजनेचा अहवाल तात्काळ जाहीर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी आज सकाळपासून उमदी भागात पाहणी करत आहेत.आज नेमके जिल्हाधिकारी त्या भागात असतानाच कर्नाटकनं तुबची बबलेश्वरची योजनेमध्ये पाणी सोडलं आहे. या योजनेतून सोडलेलं पाणी कर्नाटकातील गावांनाच जातं. पण ते सीमावर्ती भागातील तिकोंडी तलावातून पुढे जातं. काल संध्याकाळी पाणी सोडल्यानंतर आज दुपारपर्यंत हा तलाव भरला असल्याचं सांगण्यात येत आहे.दरम्यान, कर्नाटकनं पाणी सोडल्यानं तिकोंडी तलावर भरल्यानं हे पाणी जत तालुक्यातील गावांमधून पुढे गेलेलं आहे. पण नेमकं जिल्हाधिकारी या भागात दौऱ्यावर असताना आणि गेल्याकाही दिवसांपासून सीमाभागाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना कर्नाटककडून हा डिवचण्याचा प्रकार झाला आहे.