सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली-राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी): कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. कोरोना नंतर यंदा सौंदत्ती यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु, सन २००९ पासून या विषयी आपण लक्ष घातले आणि खरोखरच एस.टी भाडे आणि खोळंबा आकार कमी करण्यात यशस्वी ठरलो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या नवीन दर आकारणी प्रमाणे प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५ प्रमाणे आकारणी व खोळंबा आकार रुपये १० प्रती तास बस आकारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

 या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, यापूर्वी शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे यात्रेचे एकूण अंतर तब्बल ११०० कि.मी.प्रमाणे धरून प्रती कि.मी. ५५ रुपये दर आकारणी करण्यात आली होती. यामुळे यापूर्वी खोळंबा आकारासह प्रती एस.टी. साठी अंदाजे रु.२२,००० इतका होणारा खर्च खोळंबा आकार रद्द होवूनही सध्याच्या दर आकारणीमुळे तीन पटीने वाढून रु.६०,५०० इतका अवाढव्य होत होता. याबाबत १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून सदर दर आकारणी व किलोमीटर अंतर पूर्ववत करण्याबाबत विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यानी  तात्काळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना भाविकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चन्ने यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे प्रत्यक्ष चालविण्या आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५ प्रमाणे दर आकारणी आणि दिवसाकरिता नाममात्र रु.१०० प्रति बस खोळंबा आकार आकारण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. परंतु, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वतीने प्रसिद्ध केलेल्या दि.१४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी एकवेळची खासबाब म्हणून किमान ३०० कि.मी.प्रमाणे आकारणी न करता प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५ प्रमाणे आकारणी व खोळंबा आकार रुपये ६० प्रती तास बस आकारण्यास मंजुरी देण्यात आली. याबाबत पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेखर चन्ने यांच्याशी संवाद साधून महामंडळाने जाहीर केलेल्या दर पत्रकाप्रमाणे पुन्हा सौंदती यात्रा खर्चिक बनली असून, ती भाविकांना न परवडणारी बनली असल्याचे निदर्शनास आणून दिले. यासह भाविकांमधून खोळंबा आकार व दर कमी करण्याबाबत मागणी होत असल्याचेही सांगितले.

यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत तात्काळ कार्यवाही करून तात्काळ खोळंबा आकार वाढ मागे घेतली असून महामंडळाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी एकवेळची खासबाब म्हणून किमान ३०० कि.मी.प्रमाणे आकारणी न करता प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५ प्रमाणे आकारणी व खोळंबा आकार रुपये १०  प्रती तास बस आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे यंदाची यात्राही भाविकांसह गाडी प्रमुखांवरील खर्चाचा भार कमी करणारी झाली आहे. सदर विशेष सवलत २०२२ मधील यात्रेसह सन २०२३ मधील माघ महिन्यातील सौंदत्ती यात्रेसाठीही कायम ठेवण्यात आल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.