विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनाला यश !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील आझाद मैदानावर  गेले ४० दिवस सुरू असलेल्या विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनास अखेर यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यासाठी ११६० कोटीचे पॅकेज शासनाने जाहीर केले आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांनी दिली.

यामध्ये अघोषित, त्रुटी पात्र अंशतः अनुदानित सर्वच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना याचा लाभ मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा अधिक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना याचा लाभ मिळाला. यात उच्च माध्यमिक ७४ शाळा व तुकड्या व यामध्ये कार्यरत असणारे सुमारे ३६८ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला अशी माहिती, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रावसाहेब पानारी यांनी दिली.

या लढ्यास कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच राज्य समन्वय संघ, जिल्हा समन्वयक रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, शिवाजी पारळे, बाजीराव बरगे व संघटनेचे पदाधिकारी अप्पासो कांबळे, बाबासो चौगले, स्वप्नील बोकडे,रामचंद्र खुडे, तृप्ती शेटे व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचा  आंदोलनात सहभाग होता.

News Marathi Content