गायरान अतिक्रमणप्रश्नी प्रयत्न करणार-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : एका ग्रामपंचायतीचे अतिक्रमण काढण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयाने दिलेले निर्देश हे महाराष्ट्रातील लाखो नागरीकांना त्रासदायक ठरणार आहे. अतिक्रमण सरसकट काढयाचा निर्णय नगरीकांवर अन्याय करणारा असून गायरान मधील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येथील गायरान अतिक्रमीत नागरीकांच्या भेटी प्रसंगी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आ.प्रकाश आबिटकर म्हणाले की, गायरान अतिक्रमणांसंदर्भात जमिनीतील उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फटका राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांतील अनेक नागरिकांना बसला आहे. या लोकांनी आपल्या आयुष्यातील केलेल्या कष्टाच्या कमाईतून, बचतीतून घरे बांधलेली आहेत. काही लोकांना याच जागेवर शासकिय घरकुलेही मंजुर झालेली आहेत. ही अतिक्रमणे काढल्यास ही कुटूंबे उघडयावर पडणार आहेत. याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करून गायरान मधील अतिक्रमणे सरंक्षीत करण्यातबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रश्नाबाबत खासदार संजय मंडलिक व मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राज्य शासनाच्या वतीने मा.सर्वोच्च न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्याची विनंती केली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून युध्दपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच अशा अतिक्रमण धारणांना दिलासा मिळेल.

राज्य शासनाने मागील युती शासनाच्या काळामध्ये शासकीय जमीनीवर अतिक्रमणे नियमानूकुल करण्याबाबत धोरण निश्चिती केली होती याकरीता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निश्चित करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले होते. त्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात आली आहे. सन 2011 पुर्वीची 500 चौ.फु.पर्यंतची अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासकीय नजरान भरून कार्यवाही करण्यात आली होती. या धोरणाची अंमलबजावणी करण्यातबाबत ही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करण्यात आला आहे.  यामुळे गायरानमध्ये अतिक्रमण केलेल्या नागरीकांनी हवालदिल न होण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. त्यामुळे शासन अशा अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे कायम करण्याबाबत प्रयत्नशिल आहे.

यावेळी माजी उपसभापती अरुणराव जाधव, अशोकराव फराक्टे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, प्रल्हाद पाटील, एकनाथ हुजरे, बाळू ढेंगे, सुरेश भोई, पांडूरंग चौगले, दगडू हुजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.