
दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील अर्जुन निवृत्ती पाटील (वय ३६) यांनी सोमवारी पहाटे शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत माहिती अशी, अर्जुन पाटील आज सकाळी वैरण घेऊन येतो म्हणून पहाटे लवकर बाहेर पडले होते. सकाळी आठच्या सुमारास लिंबू टेक नावाच्या शेतात अर्जुनने झाडाला गळफास लावून घेतल्याचे लोकांना दिसले. शेतकऱ्यांनी याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. गळफास घेतल्याने अर्जुन यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती अर्जुनचे चुलते ज्ञानदेव पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी अर्जुन यांचा मृतदेह कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.
