प्रामाणिक शेतकऱ्यांची अनुदान दुसरी यादी आता नोव्हेंबर अखेरला !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंत अनुदान देण्याची घोषणा शासनाने घोषित केली. पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण कागदपत्राचा घोळ आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे दुसरी यादी काय जाहीर झाली नाही.या यादीची प्रतिक्षा करता करता शेतकरी थकला आहे. आता ही यादी या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस येण्याची दाट शक्यता आहे. शासकीय काम अन सहा महिने  नव्हे तर वर्षानुवर्षे थांब अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

या अनुदानाची घोषणा आघाडी सरकारच्या काळात झाली. पण त्यावेळी प्रामाणिक  बळीराजाच्या हातात हे अनुदान काही मिळाले नाही. तीन लाख शेतकऱ्यांनी आँनलाइन अर्ज दाखल केले. पण लवकर अनुदान मिळाले नाही. त्या नंतर शिवसेना-भाजप सरकार आले. बऱ्याच काळा नंतर पहिली यादी प्रसिद्ध झाली. १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांना आठ दिवसात अनुदान मिळेल असे सांगितले. पण दोन महिने झाले तरी अद्यापही ही यादी जाहीर झालेली नाही. आता १६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी असल्याने यादी थांबली आहे असे सांगितले जाते. अर्जदाराचे नावात साहेब,राव, सिंह असे तर आधारवर वेगळे, बँकेत  नाव तिसरे अशी परिस्थिती आहे. हे एक कारण आहे. पण प्रत्यक्ष अनुदान मिळण्यास अर्थकारण हेच मुख्य कारण आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. आता त्रुटी दूर करून या नोव्हेंबर अखेर यादी जाहीर होऊन जिल्ह्यातील १६ हजार खातेदारांच्या हातात ही अनुदान रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे.