क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रख्यात क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर अशी ओळख असणारे सचिन तेंडुलकर यांनी आज (सोमवारी) पहाटे नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात काकड आरतीला हजेरी लावल्याचे समजते.

यावेळी तेंडुलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा अर्जुन असल्याची माहिती मिळाली. मास्क घातल्याने दोघांना कोणीही ओळखले नाही. ही माहिती समजताच भागातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेली अधिक माहिती अशी, गौरव घाटगे यांनी त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे मुक्कामाला येणार असल्याची माहिती बंधू तेज घाटगे यांना दिली. परंतू कोण येणार याबाबत नाव सांगितलं नव्हते. काल (रविवारी) रात्री दहाच्या सुमारास सचिन तेंडुलकर हे उद्योजक तेज घाटगे यांच्या मुडशिंगीच्या फार्म हाऊसवर आले. त्यांना गाडीतून उतरताना बघून घाटगे परिवाराला आश्चर्य वाटलं. पहाटे चार नंतर तेंडुलकर नृसिंवाडीकडे रवाना झाले. तेथे काकड आरतीला उपस्थित राहून लगेच ते तिथून मुंबईला रवाना झाले. तेज घाटगे यांनी सचिन तेंडूलकर यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं.