भोगावती कारखान्याचे सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट-उदयसिंह पाटील

राशिवडे( प्रतिनिधी) : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असताना काटकसरीचा व पारदर्शक कारभार करत सभासद कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय दिला असून आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्वांनी आपला भोगावतीला पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी केले.

शाहूनगर परीते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर आणि प्रतिपण समारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील हे होते.

कारखान्याने गेल्या हंगामात एफआरपी प्रमाणे प्रति टन 3030 रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. तोडणी वाहतूक फरक प्रतिटन 27 रुपये राज्यात सर्वप्रथम आदा केला असून कामगारांना त्रिस्तरीय वेतन आयोगाची पगार वाढ सर्वप्रथम लागू केली आहे. यंदाच्या दिवाळीसाठी 13 टक्के बोनस दिला असून सर्व घटकांचे हित प्रामाणिकपणे जोपासले आहे असे पाटील यांनी सांगितले.

आगामी हंगामात कारखान्याने सहा लाख टन ऊस गळपाचे उद्दिष्ट ठेवले असून दिनांक 6 नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू केला जाणार आहे. सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही उपाध्यक्ष पाटील यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक पांडुरंग शंकर पाटील व त्यांच्या पत्नी छाया पांडुरंग पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा वाढदिवसानिमित्त व गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे यांना आंतरराज्य सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरूळकर, सर्व संचालक प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील माजी उपाध्यक्ष एम आर पाटील, गोपाळराव पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संदीप पाटील विजय भोसले सुशील पाटील कौलवकर, उत्तम पाटील भोगावती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालक बंडोपंत वाडकर यांच्यासह आजी-माजी संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार संचालक बी.आर.पाटील यांनी मानले.