नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

भारतीय महिला क्रिकेटर्सनी नुकतच आशिया कप २०२२ वर नाव कोरलं. मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल सुधारणेनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबाही दिसून येत आहे.त्यानंतर आता बीसीसीआयनंही एक मोठं पाऊल उचलत महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन देण्याची घोषणा केली. ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख तर टी-२० सामन्यांसाठी ३ लाख खेळा़डूंना मिळणार आहेत.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बोलताना सांगितलं की, “आपण आता लैंगिक समानतेच्या एका नव्या युगात प्रवेश करतोय. अशा परिस्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिला खेळाडूंनाही पुरुषांइतकीच मॅच फी दिली जाईल. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुषांना १५ लाख रुपये मॅच फी दिली जाते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी पुरुषांना एका सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात. तर, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना ३ लाख रुपये मिळतात. आता, पुरुष खेळाडूंप्रमाणेच ही रक्कम महिला क्रिकेटर्सनाही दिली जाईल.”