गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदार संघातील ६० धनगर व भटक्या बांधवांना भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकुल योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करून आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. यावेळी आजरा तालुक्यातील किटवडे व आवंडी येथील धनगर बांधवांनी घरकुल मंजूर केलेबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी धनगर बांधवांना घरकुल मंजूरीचे पत्र देण्यात आले.

राज्य शासनाच्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकुल योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ६० प्रस्ताव जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने राधानगरी तालुकयातील रामणवाडी-१२, राशिवडे-१, धामोड-२, कोनोली तर्फ असंडोली-४, भुदरगड तालुक्यातील बेडीव धनगरवाडा-६, वाघापूर-२, आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा-२८, किटवडे धनगरवाडा-५ आदी बांधवांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतू गेली २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रलंबित होते. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून या घरकुलांना मंजूर देण्याची मागणी केलेली होती. त्यानुसार सदरील प्रस्तावांना वित्त विभागाच्या मान्यतेने निधीची तरतूद करून मंजूरी करण्याचा शासन निर्णय इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मतदार संघातील धनगर बांधवांचा प्रलंबित असणारा घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रतिघरकुल १ लाख २० हजार रुपये या प्रमाणे या निधीचे वितरण लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीव्दारे थेट लाभार्थी वितरण पध्दतीने बांधकामाच्या टप्यातनुसार थेट जमा करण्यात येणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.