गोकुळतर्फे म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्या म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दि.२१ ऑक्टोबर २०२२ होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. यामध्ये म्हैशीच्या दुधामध्ये प्रतिलिटर २ रूपये तर गायीच्या दुधामध्ये प्रतिलिटर ३ रूपये वाढ करण्यात आली आहे. दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि या निर्णयानुसार ही दरवाढ करीत आहोत अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली.

त्यामुळे दि.२१/१०/२०२२ पासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ४७.५० असा दर तसेच गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३५.०० असा दर राहिल अशी माहिती पाटील यांनी दिली.

म्हैस व गाय दूध दर वाढ करून शेतकऱ्यांना दिवाळी निमित्ताने एक प्रकारची भेट दिली आहे. तसेच गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक,कर्मचारी,वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने दीपावली च्या शुभेच्छा ही पाटील यांनी यावेळी दिल्या.