शाहू कारखाना ‘या’ निर्मितीला प्राधान्य देणार-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी): साखर उद्योगासमोरील अडचणी पाहता भविष्यात साखर कारखान्यांना केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी भविष्याचा वेध घेत उपपदार्थ निर्मितीकडे वळावे लागेल. म्हणूनच शाहू साखर कारखाना उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४३व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

तत्पुर्वी या गळीत हंगामाचा शुभारंभ विधिवत समरजित घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह सभासद अधिकारी कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना घाटगे म्हणाले, साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी आहेत. एकूण देशातील साखरेचे उत्पादन पाहता साखर विक्रीच्या दरवाढीला मर्यादा आहेत. सहवीज निर्मिती प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विजेचा खरेदी दर दोन रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे उसापासून  इथेनॉल, बायो सीएनजी,पोटॕश व इतर उपपदार्थ निर्मितीला शाहूने प्राधान्य दिले आहे. आज गळीत हंगामास विधिवत सुरुवात झाली आहे. तरीही कारखाना प्रशासनासमोर अवकाळी पावसाचे संकट आहे. व्यवस्थापन व प्रशासन हंगाम सुरू करण्यास सज्ज आहे. एक-दोन दिवस अंदाज घेत नियमित गळीत हंगामास सुरुवात करीत आहोत.

स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून शाहूमध्ये साखर कारखानदारीत होत असलेले बदल स्विकारण्यासह भविष्याचा वेध घेऊन नियोजन करण्याची परंपरा आहे.त्यानुसार पुढील दहा वर्षात साखर उद्योग, सहकारी साखर कारखानदारी यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील व त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जाऊ याच्यासह कारखान्याच्या ऊस गाळप, इथेनॉल निर्मिती व इतर नवीन उपपदार्थ निर्मितीचे पुढील दहा वर्षाचे शाहू साखर कारखान्याचे नियोजन केले आहे अशी माहिती घाटगे यांनी यावेळी दिली. त्याला सभासद शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरांनिशी दाद दिली. शाहू साखर कारखान्याने या गळीत हंगामामध्ये ११(अकरा) लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी उसाची विल्हेवाट न करता 100% ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे. स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले.

संचालक सचिन मगदूम यांनी आभार मानले.