जयसिंगपूर (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जयसिंगपूर येथील विक्रम हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या २१ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक २०० रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत १३ ठराव मंजूर करण्यात आले.
ऊस परिषदेत यंदा १३ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शिवाय अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, भारनियमन त्वरित रद्द करून शेती पंपाला विनाकपात दिवसा १२ तास वीज द्यावी, ऊस दर नियंत्रित अद्यादेश 1966 अ यामध्ये असणारा रिकव्हरी बेस ८.५ टक्के कायम ठेवून नंतरच्या सर्व दुरुस्त्या मागे घ्याव्यात, केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ३५ रुपये करण्यात यावा, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्या या ऊस परिषदेतून करण्यात आल्या.
या परिषदेत सतिश काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तुफान टीका केली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. परंतु, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर ऊस परिषदेस गैरहजर होते. या परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह शेजारच्या कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने शेतकरी आले होते.