गुंजेगाव येथे गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेत  गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन करण्यात आले.गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या  हस्ते आणि सोलापूर विधानपरिषदचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी संघाचे इतर संचालक उपस्थितीत होते.

अध्‍यक्षस्थानी बोलताना प्रशांत परिचारक म्‍हणाले, लाखो दूध उत्‍पादक,संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांच्‍या अथक प्ररिश्रमातुन गोकुळने महाराष्‍ट्रात दुग्‍ध व्‍यवसाय यशस्‍वी केला. गोकुळ दूध संघाच्‍या विविध योजनांमुळे दूध वाढीसाठी उत्‍पादकांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळेच गोकुळ संघ  महाराष्‍ट्रातील सहकारामधील अग्रणी दूध संघ आहे. महाराष्ट्रातील खाजगी संघाना व परराज्‍यातील अमुल सारख्‍या दूध संघाना टक्‍कर देण्‍यासाठी गो‍कुळने पुढाकार घ्‍यावा. तसेच १५ हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्‍क कुलरमुळे मंगळवेढा परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन होण्‍यास मदत होणार आहे. याचा सोलापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकांना फायदा होणार आहे. गोकुळ दूध संघामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकांप्रमाणेचं सोलापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पाकांची ही प्रगती होणार आहे.  भविष्‍यात या सारखे बल्‍क कुलर्स तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात सुरू करून उत्‍तम गुणवत्‍तेचे दूध संकलन करण्यासाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू असे गौरव उद्गार त्यांनी काढले.

यावेळी बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि, गोकुळने दूध संकलनाचे कार्यक्षेत्र हे कोल्‍हापूर जिल्‍ह्यापुरतेच मर्यादित न ठेवता शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्‍ह्यात देखील दूध संकलन करण्‍यास सुरूवात केली आहे. हा गोकुळचा सोलापूर जिल्ह्यातील चौथा व मंगळवेढा तालुक्यातील पहिला बल्क कुलर आहे. उत्‍तम गुणवत्‍तेमुळे गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, सांगली, सातारा,बेळगाव तसेच कोकण विभागामध्‍ये दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. ग्राहकांच्‍या पसंतीस उतरलेले गोकुळ दूध नजीकच्‍या काळात महाराष्‍ट्राच्‍या उर्वरित भागाबरोबरच इतर राज्‍यातील प्रमुख शहरांमध्‍ये विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा गोकुळचा मानस आहे. सध्‍या १३ ते १४ लाख लिटर्स दूध संकलन करणारा गोकुळ २० लाख लिटर्स उद्दिष्‍ट निश्चितच साध्‍य करेल आणि दूध विक्रीचे क्षेत्र वाढल्‍याने दूध विक्रीमध्‍ये वाढ होऊन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देता येईल असेही पाटील यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. यावेळी संत दामाजी पंथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे, विजयसिंह मोरे, बाळासो खाडे,माजी पंचायत सदस्य सुनील पाटील, वीरशैव बँकचे संचालक अनिल सोलापुरे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, सहा.व्यवस्थापक बी.आर.पाटील, भानुदास पाटील उपस्थित होते.

🤙 9921334545