कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात चालूवर्षी ६४ नवे कुष्ठरूग्ण, २२२ नवे क्षयरूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांसह त्यांच्या संपर्कांतील व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत.

केंद्राच्या वतीने प्रतिवर्षी कुष्ठ, क्षयरूग्ण शोध मोहीम राबवली जाते. कोरोना काळात ही मोहीम थांबली होती. पण आता ही मोहीम पुन्हा राबवली गेली. यावर्षी जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर दरम्यान सक्रीय क्षयरूग्ण, कुष्ठरूग्ण शोध मोहीम राबवली. या मोहिमेतून जिल्ह्यात चालूवर्षी ६४ नवे कुष्ठरूग्ण, २२२ नवे क्षयरूग्ण आढळून आले आहेत.या मोहिमेचा कुष्ठ, क्षयरूग्णांचे निदानापासून वंचित रूग्णांचा शोध घेणे, त्यांच्यावर औषधोपचार सुरू करणे हा उद्देश आहे.
कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत ३१ लाख ४४ हजार इतकी लोकसंख्या तपासणीसाठी निश्चित केली.त्यामध्ये १२ हजार ७३३ संशयित कुष्ठरूग आढळले. त्यात ६४ नवे रूग्ण आढळले आहेत. दोन वर्षांपुर्वी ही संख्या २८ इतकी होती, ती वाढली आहे. नव्या रूग्णांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर उपचार सुरू केल्याची माहिती जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.
१५ दिवसांत अनुक्रमे २२२ क्षय आणि ६४ नवे कुष्ठरूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात अशा मोहीम सातत्याने राबवणे आवश्यक असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.दुर्गादास पांडे यांनी सांगितले.