शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

कुडित्रे (प्रतिनिधी) :  नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया आज (शुक्रवार) पासून सुरू झाली. पण काही केंद्रावर इ केवाय साठी पैशांची मागणी करण्यात आली. ५० व १०० रुपयांसासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असताना असा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. पण अनेक ठिकाणी कभी खुशी कभी गम असाच प्रकार अनुभवास आला.

दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत सर्व केंद्राना सूचना दिल्या आहेत. असा कुठे प्रकार घडल्यास सक्त कारवाई होईल असे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदें (सहकारी संस्था) यांनी सांगितले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निर्णय कोरोना व महापूर या कारणांमुळे प्रलंबित होता. नुकतीच अर्थसंकल्पात महाविकास आघाडीने तरतूद केली होती. पण राज्यातील सरकार बदलले. त्यामुळे आणखी प्रतिक्षा करावी लागणार का? अशी उलटसुलट प्रतिक्रिया शेतकरी वर्गात सुरू होती. आताच्या शिंदे व फडणवीस सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्यास मंजुरी दिली. ताबडतोब कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात एकूण एक लाख २९ हजार २६० लाभ मिळणार आहे. करवीर तालुक्यात सर्वात जास्त २०६७८ शेतकऱ्यांना लाभ  मिळणार आहे.  करवीरचा भाग कोल्हापूर शहरातील १२१  शेतकरी पात्र ठरले आहेत. करवीर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यापाठोपाठ कागल तालुक्यात १२ हजार ८४७ शिरोळ – १४ हजार ७१५, शाहुवाडी – ३ हजार ८३८, राधानगरी  ११ हजार ७०६, पन्हाळा – ११ हजार ५२९, हातकणंगले – १२ हजार ८६, गडहिंग्लज – ९ हजार ५९४, भुदरगड – ८ हजार ९०७, आजरा – ८ हजार ११७, गगनबावडा- २ हजार २७० लाभार्थी आहेत.