कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या  खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा हे केवळ तासाचे अंतर आहे. पण आता कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर पार करण्यास दोन तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून असंतोष व्यक्त होत आहे.

कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर तळकोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दररोज हजारोंच्या पटीत वाहने या रस्त्यावरून धावतात. या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने मार्ग वाहतुकीस अपुरा पडत आहे. रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत. या रस्स्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. बालिंगे येथे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. बालिंगे ते दोनवडे दरम्यान रस्ताच खचला आहे. भोगावती नदीवरील पूल ते दोनवडे फाटा या दरम्यान पुराचे पाणी येते. दरवर्षी येथे रस्ता खचत चालला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. केवळ खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साईड पट्ट्या खचत चालल्या आहेत. ओव्हरटेक करताना वाहन रस्त्यावरून उतरताना अपघात घडत आहेत. किरकोळ अपघात तर नित्याचेच आहेत. जीव मुठीत धरून या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. केंद्र सरकारने कोल्हापूर-गगनबावडा मार्गाला ‘१६६ जी’ राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले आहे. सध्या या मार्गाचे  रुंदीकरण व दुपदरीकरण होणार आहे. रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. पुढील वर्षी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. पण सध्या अपघाताची मालिका पाहता रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे आहे.

खड्ड्यामुळेच बळी  !

सप्टेंबर महिन्यात बालिंगे येथील  पेट्रोलपंपाजवळ दोन तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले. खड्डे चुकवताना ही घटना घडली. दोन महिन्याभरापूर्वी खड्डा चुकवताना पाठीमागून आलेल्या आराम बसच्या चाकाखाली सापडून युवकाचा हकनाक बळी गेला.