कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला.
बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात संस्थांना हे वितरण करण्यात आले. बँकेशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १० हजार ३०६ संस्थांना दहा टक्केनुसार डिव्हिडंड वर्ग करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, महिन्यापूर्वी बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष आमदार हसनस मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी सहकारी संस्थांना दहा टक्के डिव्हिडंड देणार असल्याची घोषणा केली होती. त्या शब्दाची ही वचनपूर्ती आहे. यावेळी भैरवनाथ सहकारी विकास सेवा संस्था- केनवडे, कोडीको बँक एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी- कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची पतसंस्था- कोल्हापूर या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.