अन्ननलिकेत अडकली पिन; शस्त्रक्रियेनंतर बालिकेला जीवदान

कोल्हापूर : सात वर्षांच्या बालिकेला दोन दिवसांपूर्वी गिळताना त्रास होत असल्याने तिने आक्रोश मांडला होता. तिचे हाल पाहून आई-वडिलांनी तिला मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सीपीआरमध्ये आणले. तिच्या छातीचा तसेच मानेची क्ष-किरण तपासणी केली असता तिच्या अन्ननलिकेत केसांत घालायची पिन अडकल्याचे दिसून आले. संभाव्य धोके लक्षात घेउन डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भूल देऊन दुर्बिणीद्वारे त्याच पहाटे शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेत अडकलेली ही केसांची पिन काढली आणि या बालिकेला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर काल, बुधवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. लोकरे यांनी सांगितले.

पन्हाळा तालुक्यातील गरीब कुटूंबातील या बालिकेचे आई-वडील तिला मंगळवारी रात्री दोन वाजता सीपीआर मध्ये घेऊन आले. तिने दोन दिवसांपूर्वी केसांची ही पिन गिळली होती. तिच्या लक्षणांवरुन डॉक्टरांनी तिच्या छातीची तसेच मानेची एक्स-रे (क्ष-किरण) तपासणी केली, तेव्हा ती पिन अन्ननलिकेत अडकल्याचे आढळले. रुग्णांच्या नातेवाईकांनी या शस्त्रक्रियेची माहिती, तसेच संभाव्य धोके यांची कल्पना देउन पहाटे २.४५ वाजता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय) येथे हिरण्यकेशी इमारतीत कान, नाक, घसाशास्त्र विभागात दाखल केले.मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भूल देउन दुर्बिणीद्वारे ही पिन काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

यासाठी कान, नाक, घसाशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजित लोकरे, सहयोगी प्राध्यापक तदर्थ डॉ. वासंती पाटील आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. त्यांना अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरिष कांबळे, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप रावत यांनी सहकार्य केले.

🤙 8080365706