कोल्हापूर प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासन तसेच गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याने लम्पीच्या भीतीने दूध उत्पादकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तपासणी करून तातडीने औषधोपचार सुरु करावा.लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय पशुसंवर्धन सचिव तसेच संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील लम्पीची लागण झालेल्या पन्हाळा, शिरोळ, आजरा तालुक्यातील गावांचा डॉ.चेतन नरके यांनी दौरा केला आणि लागण झालेल्या जनावरांच्या गोठ्यांना भेटी देऊन दूध उत्पादकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी पेंढारवाडी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
शासकीय यंत्रणा आणि जिल्हा दूध संघाची यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. या संकटाच्या काळात दूध उत्पादकांच्या समस्या जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी इंडियन डेअरी असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि शेजारील राज्यांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. विनोद पोवार, गोकुळ दूध संघाचे डॉ. यु.एम. मोगले यांच्यासह तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.