हद्दवाढीविरोधात उद्या उचगाव बंद; निषेध सभाही होणार

उचगाव : कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हद्दवाढीला विरोध करण्याचा वज्रनिर्धार उचगाव (ता. करवीर) येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या लढ्यासाठी हद्दवाढविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्यावतीने सोमवार दि.१९ रोजी उचगाव संपूर्ण बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली.

बंद दरम्यान अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलेले आहेत. या समितीमध्ये उचगावातील सर्व तरुण मंडळे, शेतकरी व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, गांधीनगर पोलीस ठाण्यात हद्दवाढविरोधी कृती समितीच्यावतीने आंदोलनाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना दिले आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या हद्दवाढीमध्ये उचगाव गावाचाही समावेश आहे. या प्रस्तावाला उचगावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवा वर्ग व सर्वच पदाधिकारी यांचा विरोध आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी गावातील सर्वपक्षीय तरुण मंडळे शनिवारी मंगेश्वर मंदिरात एकत्र आली. हद्दवाढविरोधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने आंदोलन घेऊन तीव्र विरोध करण्याचा निर्णय यावेळी झाला. यावेळी सोमवारी दिनांक १९ रोजी उचगाव बंदची हाक देण्यात आली असून यावेळी निषेध सभा ही घेण्यात येणार आहे.