वडणगे (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक घटकांसाठी येणार्या प्रत्येक प्रसंगावेळी ग्रामस्थांना त्या समस्येतून सावरण्यासाठी बी. एच. दादाप्रेमी युवक मंचचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून गावामध्ये लोकांसोबत राहून काम करणाऱ्या युवक मंचच्या पाठपुराव्यामुळे नुकताच जनावरांत सुरू असलेल्या लम्पी या संसर्गजन्य रोगांपासून गावातील सर्व जनावरांचे संरक्षण व्हावे यासाठी वडणगे गावात तातडीने लसीकरणास सुरुवात झाली. प्राथमिक टप्प्यांमध्ये गावातील सर्वच गाई, बैल, वासरांना ही लस मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व गोकुळ दूध संघ तसेच पशुवैद्यकीय दवाखाना वडणगे यांचे सहकार्य लाभले.
वडणगेत जनावरांची संख्या जास्त असून या रोगाचा प्रादुर्भाव वेळीच थांबविण्यासाठी युवक मंचच्यावतीने जिल्हा परिषद व दूध संघाशी पत्रव्यवहार तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गावामध्ये एकाच दिवशी सामुदायिक लसिकरणाची मोहीम हातात घेण्याची मागणी केली होती. त्याला तात्काळ यश येऊन आज प्रत्यक्षात लसिकरणाला सुरवात झाली.
ही लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी रविंद्र पाटील, डॉ रविराज कोरे, डॉ विनायक देवणे, डॉ मोहन पाटील, उत्तम पाटील, हर्षद पाटील, निखील शेलार, रितेश जाधव, सचिन शिंगारे, श्रीकांत नाळे, सुभाष चौगले, शुभम पाटील, अवधूत पाटील आदींनी सहभाग घेतला.