कोल्हापूर प्रतिनिधी : एफआरपी चे तुकडे न होऊ देता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज शुक्रवारी ८४ वी सर्वसाधारण सभा पार पाडली. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात ही सभा घेण्यात आली. यावेळी मुश्रीफ यांनी ही घोषणा केली.
पुढे मनोगत भाषणात बोलताना अध्यक्ष आ.हसन मुश्रीफ यांनी बँकेचे कामकाज, बँकेचा झालेला फायदा, बँकेने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना आणि बँकेची वाटचाल याबद्दल माहिती दिली.
दरम्यान, सभेत विषयांचे वाचन करत असताना नऊ नंबरच्या विषय वाचनावेळी सभासदांनी हा विषय मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे सभेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. तरीही सभेमध्ये एकूण १० विषयांचे वाचन करण्यात आले. या सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली.
नऊ नंबरच्या विषयाला सभासदांची मंजुरी नसतानाही हा विषय जबरदस्तीने मंजूर करण्यात आला. आणि हि सभा आटोपण्यात आली असा आरोप बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केला. आणि त्यांनी सभागृहाच्या बाहेर समांतर सभा घेतली.
या सभेला बँकेचे संचालक आ.सतेज पाटील, राजूबाबा आवळे, राजेंद्र पाटील यड्रावकर, विनय कोरे, पी.एन.पाटील, राजेश पाटील, खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, अर्जुन आबिटकर, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,अमल महाडिक आदींसह संचालक,बँकेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.