बहिरेश्वर प्रतिनिधी : बहिरेश्वर ता.करवीर येथे गोकुळ दुध संघामार्फत जनावरांना लसीकरण करण्यात आले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या लसीकरणाला सुरवात करण्यात आली.
लम्पीस्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी गोकुळ दुध संघाने खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन जनावरांना मोफत लस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात बहिरेश्वर या गावातून करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ.इंगळे यांनी पशुपालकांना योग्य मार्गदर्शन केले व जनजागृती केली. या आजारांमध्ये पशुपालकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी सर्व प्रथम बहिरेश्वर गावाला प्राधान्य दिल्याबद्द्ल ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोकुळ दुध संघाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चौगले, संभाजी पाटील, के.वाय.पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, स्थानिक डॉ.सुरेश मोरे, डॉ.प्रकाश दिंडे, डॉ.निता सुतार, डॉ.वैभव पाटील, डॉ.विनायक गोसावी, डॉ.ओंकार हावलदार व ग्रामस्थ तसेच पशुपालक उपस्थित होते.