करवीर प्रतिनिधी : सरनोबतवाडी ब्रीज ते शिवाजी विद्यापीठ पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच या मार्गावरील स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे अशी मागणी भाजपा ओ.बी.सी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंतांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की,सरनोबतवाडी ब्रीज ते राजाराम तलाव येथून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच राजाराम तलावातील पाणी ओढ्याच्या रूपाने रस्त्यावरून जाते. त्यामुळे सदर रस्त्यावर जिवीत हानी होण्याआगोदर रस्ता दुरूस्त करून घेण्यात यावा, तसेच सदर रस्त्याला लाईटची सोय नसल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.तरी रस्त्याची डागडुजी करून त्या रस्त्याला स्ट्रीट लाईटची सोय लवकरात लवकर करावी असा उलेख केला आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी, भाजप ओ.बी.सी जिल्हा कार्यकारी सदस्य रूपेश परीट,ओमकार शिंदे आदींच्या सह्या आहेत.