नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा : आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील महसुल विषयक कामकाज करण्यासाठी गारगोटी येथे ब्रिटीशकालीन इमारतीत कामकाज सुरू आहे. सदरची इमारत जिर्ण व नादुरूस्त झाल्यामुळे प्रशासकीय कामे करण्यासाठी अडचणी येत असून यामुळे नागरीकांना देखील त्रास होत आहे. यामुळे तहसील कार्यालय भुदरगडची नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी तहसीलदार अश्विनी आढसूळ व बांधकाम उपअभियंता मिरजकर यांना केल्या.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, गारगोटी हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यामध्ये 97 महसूली गावे कार्यरत आहेत. तालुक्यतील सर्व गावांची महसूल विषयक कामकाज गारगोटी येथील 100 वर्षे पुर्वीच्या इंग्रज कालीन इमारतीत सुरू आहे. सदरची इमारत काळनारुप जिर्ण व नादुरूस्ती झाल्याने येथील प्रशासकीय अधिकारी यांना कामकाज करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच यामुळे नागरीकांना देखील नाहक त्रास होत आहे. तसेच जुने दत्तावेज व कागदपत्रे संरक्षीत करणे देखील अडचणीचे होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता महसूल इमारतीचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. याचा फायदा प्रशासनाला आणि सामान्य जनतेला होतो, यामुळे प्रशासनाचे काम सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये  प्रशासनाची  सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.त्या अनुषंगाने तहसील कार्यालयास भेट देत जुन्या कार्याची पहाणी केली व त्या अनुषंगाने आवयक तो परीपुर्ण प्रस्ताव व आराखडा तयार करून राज्य शासनास तात्काळ सादर करण्याच्या सुचना संबंधीतांना केल्या.

यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, तहसीलदार अश्विनी आडसूळ, पोलीस निरीक्षक मोरे, बांधकाम उपअभियंता मिरजकर, माजी उपसरपंच अरुण शिंदे, संजय गांधी समितीचे सदस्य संग्राम सावंत, माजी सरपंच योगेश पाटील, सागर शिंदे, युवराज आरडे, जितेंद्र भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.