कोल्हापूर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीने १२ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातील ४० तज्ञांची निवड करण्यात आली आहे. या तज्ञांमध्ये डॉ.चेतन नरके यांचा समावेश आहे. ‘डेयरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थ चक्र’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक स्तरावर दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन करणारे ते गोकुळच्या इतिहासातील पहिलेच संचालक आहेत. चेतन नरके यांच्या मुळे शिखर संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राला देखील पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले आहे. या शिवाय परिषदेतील ते सर्वात तरुण वक्ते ठरले आहेत. डॉ.चेतन नरके पूर्व आशियातील नामवंत अर्थतज्ञ आहेत. थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. नुकतीच त्यांची संपूर्ण देशातील दूध उत्पादक शेतकरी गटातून इंडियन डेयरी असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाली आहे.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीने डेयरी उद्योगातील सर्व घटकांच्या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी या संमेलनाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. संमेलनात वैज्ञानिक आणि तांत्रिक परिषदा तसेच प्रदर्शनाचा समावेश असतो. यंदाच्या संमेलनात जगभरातून सुमारे २५०० प्रतिनिधि सहभागी होणार आहेत. प्रतिनिधीत दुग्ध उत्पादक शेतकरी, डेअरी प्रक्रिया कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी, डेअरी उद्योगाला पुरवठा करणारे उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी इत्यादींचा समावेश आहे.
सुरक्षित आणि शाश्वत दुग्धव्यवसायासाठी नवीनतम संशोधन निष्कर्ष, डेअरी प्रक्रिया, पॅकेजिंग, विश्लेषण, पशु आहार आणि पशु आहार घटक, डेअरी प्लांटमधील संबंधित उपयुक्तता, विभागांच्या क्षेत्रातील नवीनतम नवकल्पना, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक अर्थाने जागतिक डेअरी क्षेत्राशी संबंधित अनुभवांचे ज्ञान प्राप्त करण्याची संधी या संमेलनातून उपलब्ध होणार आहे.
आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघाच्या वतीनेच दिनांक ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे सर्व देशातील शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या प्रश्नावर, या क्षेत्रातील तज्ज्ञांची परिषद आयोजित केली आहे. या परिसंवादात देखील भारताचे प्रतिनिधित्व डॉ.चेतन नरके करणार आहेत.