‘समाजकल्याण’च्या योजनांची तपासणी करणार : संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत गावोगावी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. वैयक्तिक व सामुहिक योजनांची जिल्हा परिषदेच्या वेगवेगळया यंत्रणेमार्फत तपासणी करुन, लाभार्थीनी सदरचे साहित्य खरेदी करुन त्याचा वापर केला आहे का नाही? तसेच सामुहिक योजनेअंतर्गत सदरचे काम समाजकल्याण विभागाने नेमून दिलेल्या वस्तीतच झाले आहे का ? त्याचबरोबर त्याचा दर्जा कसा आहे याबाबत तपासणी करणार असून सदर कामात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी समाज कल्याण समितीच्या बैठकीत सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थीनींना सायकल करीता दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी करावी व सायकल कंपनीशी संपर्क साधून विद्याथ्यांना मजबूत व टिकाऊ सायकल बाबतच्या दराबाबत निश्चिती करावी अशी सूचना चव्हाण यांनी केली.

दिव्यांग शाळेच्या कार्यशाळेमध्ये कागदी लगद्यापासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, गौरी मुखवटे, बैल याबरोबरच इतर खेळणी बनविणेसाठी लागणारे यंत्र तसेच शिलाई मशिन, लॅमिनेशन मशिन, ट्रॅम्पोलीन स्पायरल बाईंडींग मशिन, मेणबत्ती बणविण्याचे मशिन, पक्षांची घरटी बणविण्यासाठी लागणारे साहित्य सन २०२२-२३ मधील तरतूदीमधून पुरविणेत यावे. अशाही संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत चव्हाण यांनी सूचना केल्या.
बैठकीस समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे व समाज कल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.