प्रयाग चिखली : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिस, दोन दूध संस्था तसेच एका मॉलमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, प्रयाग चिखली येथील मुख्य चौकामध्ये असलेल्या जी डी पाटील सहकारी दूध संस्था* व जी डी पाटील मॉल तसेच येथील मेन रोड वरील पोस्ट ऑफिस तसेच याच इमारतीतील संत ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाज्यांची कुलपे तोडून आत प्रवेश करून चोरी केली आहे. पोस्ट ऑफिस, दोन संस्था आणि एका मॉल मधील शिल्लक रोकड चोरट्यानी लंपास केली आहे. या घटनेमुळे प्रयाग चिखली परिसरात खळबळ माजली आहे.
दरम्यान चोरट्यांचा वेध घेण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चार चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधून चोरी केल्याने त्यांना ओळखणे कठीण झाले आहे.
सध्या ग्रामीण भागातील दूध संस्थांच्या वतीने ठेवी आणि दूध बिल वाटप साठी दूध संस्थांच्या कार्यालयात पैशाची आवक- जावक मोठ्या प्रमाणावर होत असते त्याच अनुषंगाने चोरट्याने दूध संस्था फोडण्याचा बेत आखला असावा अशी चर्चा परिसरात चालू आहे.