मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी… विरोधकांची नवी घोषणा, घोषणाबाजी करताना अनेकांना हसू अनावर झाले. छगन भुजबळ, अजित पवार, आदित्य ठाकरे, नितीन राऊत, शशिकांत शिंदे यांनी घोषणाबाजी केली.
विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनानचा आज दुसरा दिवस आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी, ईडी कारवाया आणि एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीवर घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे. विधानभवानाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोस्टरबाजी केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहटी, चलो गुवाहटी, असे पोस्टर विरोधकांनी झळकावले. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन करत घेरण्याचा प्रयत्न केला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले.