फडणवीसांचा सागर बंगला म्हणजे ‘वॉशिंग मशिन : ‘यांचे’ टीकास्त्र

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच्या राजकीय घडमोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला देखील होत्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस – रश्मी शुक्ला यांच्या सागर बंगल्यावरील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या भेटीवर आता काँग्रेसने टीकास्त्र डागले आहे. फडणवीस वॉशिंग मशीन झालेत, फडणवीसांचा सागर बंगला वॉशिंग मशीनचे काम करत असेल. अशा शब्दात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप आहेत. 2019 विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेदरम्यान शुक्ला यांनी मविआतील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप शुक्लांवर असून याप्रकरणी त्यांची चौकशीदेखील महाविकास आघाडीने सुरु केली होती. तसेच, राज्याच्या गुप्तचर विभागातून त्यांची बदलीही करण्यात आली होती.

या फोन टॅपिंग प्रकरणात आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याचप्रकरणावर आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.